मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला बहुमत मिळाले. 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा 9 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधासभेच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती.
मात्र नोव्हेंबर महिन्यात निकाल लागून महायुती पुन्हा सत्तेवर आली, डिसेंबरमध्ये शपथविधी झाला, मार्चमध्ये नव्या सरकारचा अर्थसंकल्पही झाला. पण अजूनही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. दर महिन्याला 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं कधीपासून लक्ष लागलं आहे. याबाबत लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार असल्याचं वैद्यकीय शिक्ष मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार. त्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मत मिळणार नाहीत याची आम्हाला माहिती आहे. तसचे नमो सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी होणार ही खोटी बातमी आहे. कोणत्याही महिलेचे पैसे कमी केले जाणार नाहीत, असेही मुश्रीफांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी आणि विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप हसन मुश्रीफ यांनी केला.
हसन मुश्रीफ यांचं हे वक्तव्य अतिशय असंवेदनशील आहे. मी इतक्या असंवेदनशील लोकांबद्दल कमेंट करणारचं नाही. लोकप्रतिनिधी हे सेवा करण्यासाठीच निवडून येतात. मुश्रीफांचं वक्तव्य हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
