भुसावळ : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेत प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून यात दोन अल्पवयीन आहेत. युवराज हिम्मत पवार (२२), नरेंद्र संतोष पवार (२२) आणि प्रवीण मधुकर पवार (२१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी महिला पती आणि कुटुंबीयांसह शेगावहून जळगावकडे येण्यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवास करीत होती. यावेळी डब्यामध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत, वरील संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाइकांशी अश्लील वर्तन केले. या संशयितांनी फिर्यादी आणि तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेलाही त्रास दिला. गाडी भुसावळ स्थानकात येताच महिलेच्या नातेवाइकांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



