Home » राष्ट्रीय » झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून सफाईकामगार महिलेचा मृत्यू

झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून सफाईकामगार महिलेचा मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था 

पिंपरी चिंचवड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत झाडू मारणाऱ्या महिलेचा सोसायटीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आशाबाई ढोणे (वय 46) असे मृत महिलेचे नाव असून त्या डुडूळगाव येथील यशदा स्प्लेंडर पार्क सोसायटीत सफाईचे काम करत होत्या. या दुर्घटनेचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाई सायंकाळी नियमित झाडलोट करत होत्या. झाडू मारत टाकीजवळ गेल्यावेळी भूमिगत पाण्याच्या टाकीला झाकणच नव्हते. लक्ष न गेल्याने त्यांचा पाय थेट टाकीत गेला आणि त्या खाली कोसळल्या. पाण्याची टाकी पूर्ण भरलेली असल्याने काही क्षणांतच त्या बुडाल्या. त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या, मात्र त्या कोणालाच ऐकू गेल्या नाहीत.

काही वेळानंतर सुरक्षा रक्षक पाहणीसाठी त्या परिसरात आले असता, आशाबाई टाकीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले. दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, पण तोपर्यंत आशाबाईंचा मृत्यू झाला होता. मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

या घटनेमुळे ढोणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोसायटीतील निष्काळजीपणा आणि टाकीवरील झाकण न लावण्याच्या सवयीवरून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये अशाच पद्धतीने भूमिगत टाक्यांचे झाकण योग्य प्रकारे न लावल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याचेही उघड झाले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *