अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पातोंडा येथील तरुणाचा मका काढताना गळ्यातील रुमाल थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन सुरेश बिरारी (३६) असे मयत विवाहित तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी सुरेश रामदास पाटील यांचे खवशी रस्त्यालगत नांद्री शिवारात शेतजमीन आहे. त्यांनी खरीप हंगामात मका लागवड केली होती. मागील महिन्यात सततच्या पावसामुळे व कमी बाजारभावामुळे त्यांनी मका पीक कापून शेतात मकाच्या ढीग केला होता. २१ रोजी सकाळी सुरेश रामदास बिरारी यांचा मुलगा नितीन हा मका काढण्याचे थ्रेशर मशीन व ट्रॅक्टर घेऊन शेतात गेला. मका काढत असताना मक्याचे दाणे शेतात पडत असल्याने तो मका काढण्याच्या मशीनीखाली पाल टाकत होता. त्याच्या गळ्यातील लांब रुमाल मका काढण्याच्या थ्रेशर मशीनच्या ब्लोअरमध्ये अडकला व काही कळण्याच्या आतच त्याच्या मानेला जोराचा गळफास लागला. त्याला उपचारासाठी अमळनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे. नितीनवर घराची जबाबदारी होती. तो घरातील एकमेव कमावता होता.
दहा महिन्यापूर्वी नितीन बिरारी याच्या मोठा भाऊ योगेश बिरारी याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. त्यालाही दोन मुले आहेत. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी नितीनवर होती. आता नितीनही सोडून गेल्याने दोन्ही भांवांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.



