जळगाव : प्रतिनिधी
विषारी औषध प्राशन केलेल्या अत्यवस्थ रुग्णाचा उपचार घेताना रविवार, २ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जळगाव येथे मृत्यू झाला. रवींद्र जयराम गायकर (वय ३८, रा. बोदवड) असे मृताचे नाव आहे. रवींद्र गायकर यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना २८ रोजी संध्याकाळी घडली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्राथमिक उपचाराअंती अधिकच्या उपचारासाठी त्यांना जळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद देत असताना अचानक रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून, विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अय्युब तडवी हे करीत आहेत.



