Home » महाराष्ट्र » दारूच्या दुकानाजवळ तरुणाचा मृत्यू : नागरिकांनी दुकानाची केली जाळपोळ !

दारूच्या दुकानाजवळ तरुणाचा मृत्यू : नागरिकांनी दुकानाची केली जाळपोळ !

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील चोरगाव येथील एका तरुणाचा दारूच्या दुकानाजवळच मृत्यू झाल्याची घटना घडली. या वेळी पोलीस तेथे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता नेण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्याची घटना घडली. 

सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या चोरगाव येथील कांतीलाल अशोक सोनवणे (वय ३५) या तरुणाचा दि.९ ऑक्टोबर रोजी दुपारी दारूचा दुकानाजवळ मृतदेह आढळून आला. याबाबत गावात माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या वेळी त्या दुकानाची तोडफोड करुनही तेथे जाळपोळ केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलण्यास नागरिकांनी मज्जाव केला. तेथील नागरिकांना पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणाचा विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

तसेच रस्ता जाम करुन मृतदेह उचलण्यास मज्जाव केला. या सहा महिन्यात दारुमुळे जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे घटनास्थळी नागरिक बोलत होते. यामुळे तेथे तणावाचे वातावरण होते. याबाबत पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याचा जो अहवाल येईल, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून नागरिकांची समजूत काढण्याचा पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, रात्री उशिरा पोलीसांनी नागरीकांची समजून काढली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यास नागरीकांनी संमती दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *