जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या थरारक दुर्घटनेत ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या तिघांचे अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे प्राण वाचले. या घटनेत ९१ वर्षीय वृद्ध आणि त्यांचा नातू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, रामलाल हिरामण भावसार (वय ९१), त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार (वय २२) आणि शेजारी राहणारा देवेंद्र राजेंद्र खाचणे (वय २२) हे घरातील विहिरीत बसविण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढण्याचे काम करत होते. त्यावेळी विहिरीवरील सिमेंटची धाप अचानक तुटल्याने तिघेही सुमारे ५० फूट खोल विहिरीत कोसळले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने बचावकार्य राबवत तिघांनाही विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जखमींना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात रामलाल भावसार आणि सिद्धेश भावसार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर देवेंद्र खाचणे याला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरातील धोकादायक व बंदिस्त विहिरींची तातडीने तपासणी करण्याचे आणि संबंधितांना नोटिसा बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
अग्निशमन दलाच्या तत्परता आणि धाडसी बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


