Home » जळगाव » जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन शिस्त’ सुरू; टवाळखोर, मद्यपी आणि नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन शिस्त’ सुरू; टवाळखोर, मद्यपी आणि नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी | शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान वाईन शॉप परिसर, सार्वजनिक ठिकाणे, मोकळी मैदाने तसेच खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची तपासणी करण्यात येत असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच महामार्गालगतच्या काही हॉटेल्स व धाब्यांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस परिसरात विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. भरधाव वेगाने वाहने चालवणे, स्टंटबाजी करणे, तसेच मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर वापरून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

याशिवाय शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील नियमबाह्य व्यवसायांवरही पोलिसांची नजर असून संबंधित कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. शहरातील काही कॅफे, लॉजिंग व हॉटेल्समध्येही आकस्मिक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
“नागरिकांची सुरक्षितता आणि कायद्याचे पालन हे सर्वोच्च प्राधान्य असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,” असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही विशेष मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *