जळगाव : पोलीस मुख्यालय, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांवर कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी दोघांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्री ९:२० वाजता राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, जळगाव यांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान गार्ड ड्युटीवर नियुक्त असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळून आले.
याचवेळी अधिक गंभीर बाब समोर आली. गार्ड रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ३ एस.एल.आर. रायफल बट नं. ८२.२६२.८८२ या कोणताही दारूगोळा नसताना आणि आवश्यक सुरक्षा न राखता बेवारस अवस्थेत आढळल्या. संवेदनशील ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शस्त्रास्त्रांची सुरक्षितता न राखणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही अंमलदारांचे वर्तन हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा, वरिष्ठ आदेशांचे उल्लंघन आणि शिस्तभंग यामुळे दोघांविरोधात तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, निलंबन कालावधीत संबंधित अंमलदारांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथे राहणार असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पोलीस दलात शिस्त आणि जबाबदारीबाबत कठोर संदेश देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.




