Home » जळगाव » अमळनेर » पारोळा तालुक्यात सरकारी जमिनीचा मोठा घोटाळा; ७ ग्रामसेवक, ८ सरपंचांवर कारवाईचे आदेश

पारोळा तालुक्यात सरकारी जमिनीचा मोठा घोटाळा; ७ ग्रामसेवक, ८ सरपंचांवर कारवाईचे आदेश

पारोळा प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंप्री मोंढाळे येथे सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी मालकीची दाखवून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कठोर भूमिका घेत तत्कालीन ७ ग्रामसेवक, ८ सरपंच तसेच इतर सुमारे ४० भूमाफियांविरोधात फौजदारी आणि प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित जमीन पुन्हा सरकारी ताब्यात घेऊन अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी केला. गेल्या साडेचार वर्षांपासून त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत बनावट व्यवहारांची कागदपत्रे आणि पुरावे प्रशासनासमोर मांडले होते. त्यानंतर एरंडोल उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आली.

चौकशीत पिंप्री मोंढाळे येथील गट क्रमांक १४० आणि सर्व्हे क्रमांक ८४ मधील सरकारी गायरान जमिनीचे बनावट नमुना क्रमांक ८ चे उतारे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या कागदपत्रांवर सक्षम अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शासकीय शिक्क्यांचा वापर करून जमीन खासगी मालकीची असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित नोंदी ग्रामपंचायत दप्तरी घेण्यात आल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.

या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे पारोळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची मूळ मालकी न तपासता तब्बल २२ वेळा खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद करण्यात आली. त्यामुळे ही जमीन पुढे अनेक नागरिकांना विकण्यात आली आणि फसवणुकीची मोठी साखळी निर्माण झाली.

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन नावावर करून घेतल्यानंतर संबंधितांनी त्या जागेवर पक्की बांधकामे, शेततळे तसेच पोल्ट्री फार्म उभारल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सरकारी जमिनीवर प्रत्यक्ष कब्जा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

तक्रारदार गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी आरोप केला की, हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. काही संशयितांनी पोलीस यंत्रणेतील काही व्यक्तींशी संगनमत करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचाही प्रयत्न केला. संघर्षाच्या काळात त्यांना धमक्याही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चौकशी समितीला सहकार्य न केल्याबद्दल गटविकास अधिकारी संजय तुकाराम मोरे यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संबंधित ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर भूमाफियांविरोधात लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संशयितांमध्ये या नावांचा समावेश

या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक डी. बी. पाटील, महेंद्र सोनवणे, एन. आर. चंदरै, दिलीप पाटील, राजेंद्र सोनवणे, हरिभाऊ मारवडकर आणि जगदीश बाविस्कर यांचा समावेश आहे.

तसेच तत्कालीन सरपंच राजेंद्र भीमराव पाटील, कैलास राघो पाटील, मीराबाई पाटील, गंभीर नथ्थू पाटील, लताबाई पाटील, राजेंद्र भगवान पाटील, विजय भाऊराव पाटील, गोकुळ विसावे तसेच प्रभारी सरपंच पुष्पा पाटील यांची नावे समोर आली आहेत.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *