Home » जळगाव » नशिराबादमध्ये नंदकिशोर महाजन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; नगराध्यक्ष-नगरसेवकांची सदिच्छा भेट

नशिराबादमध्ये नंदकिशोर महाजन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; नगराध्यक्ष-नगरसेवकांची सदिच्छा भेट

नशिराबाद : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, “नंदकिशोर महाजन हे विकासाभिमुख नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यासारखे सक्षम नेतृत्व विधान परिषदेत गेल्यास शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळेल.”

आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित नगरसेवकांना नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

या सदिच्छा भेटीमुळे नशिराबाद परिसरात महायुतीच्या प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र असून, स्थानिक पातळीवर नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *