Home » राजकीय » नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवात शरद पवारांचा गौरव; म्हणाले, “जनतेशी बांधिलकी ठेवणारा नेता”

नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवात शरद पवारांचा गौरव; म्हणाले, “जनतेशी बांधिलकी ठेवणारा नेता”

मुक्ताईनगर : एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मुक्ताईनगर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खडसे यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. “नाथाभाऊंनी जनतेशी बांधिलकी ठेवली; महाराष्ट्राला लोकांसाठी झटणारा नेता दिला,” असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

शरद पवार म्हणाले की, एकनाथराव खडसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांचे गहिरे स्थान निर्माण झाले आहे. विधानसभेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत सरकारच्या धोरणांवर ठाम भूमिका घेत जनहिताचा आवाज बुलंद केला.

“विधानसभेत विरोधी पक्षाचे भाषण ऐकायचे असेल तर उत्तमराव पाटील आणि एकनाथराव खडसे यांची भाषणे कायम लक्षात राहायची,” अशी आठवणही पवार यांनी सांगितली.

खडसे यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना पवार म्हणाले की, अल्पकाळ सत्तेत राहूनही त्यांनी पाटबंधारे यासह अनेक खात्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्रात एकाच वेळी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळणारे मंत्री म्हणूनही त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो.

खडसे यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना पवार यांनी जनसंघ आणि भाजपमध्ये काम करताना पक्ष संघटना जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह एकनाथराव खडसे यांचे नाव या कार्यात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.

“राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही नाथाभाऊंना सोबत घेतले. विधानसभेत त्यांनी मोलाची साथ दिली,” असेही पवार म्हणाले.

“मुक्ताईनगर, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्राने दिलेला लोकांसाठी झटणारा नेता म्हणजे एकनाथराव खडसे,” असे सांगत पवार यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी समरस होऊन शेवटपर्यंत काम करण्याची त्यांची बांधिलकी कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार जयंतराव पाटील, खासदार भास्कर भगरे, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *