जळगाव | प्रतिनिधी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे KYC (eKYC) अपडेट करून देण्याचा बहाणा करत एका विकृताने महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
KYC च्या नावाखाली घरात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गोकुळ चव्हाण हा एका महिलेच्या घरी गेला.
“तुमच्या लाडकी बहीण योजनेचे KYC अपडेट करायचे आहे,” असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
यानंतर कागदपत्रे तपासण्याच्या बहाण्याने त्याने संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळे महिला घाबरली असून तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
दुसऱ्या महिलेलाही आमिष
या आरोपीचे प्रकार इथेच थांबले नाहीत.
त्याने आणखी एका महिलेला “तुमची बंद पडलेली विधवा पेन्शन पुन्हा सुरू करून देतो,” असे सांगत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
या प्रक्रियेच्या मोबदल्यात त्याने त्या महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
पीडित महिलांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


