जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या पाळधी गावातील बँड व्यवसायिकाच्या बँडचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी ७ संशयितांना अटक करून तब्बल ६ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बँड साहित्य चोरीस गेल्याचे शुक्रवारी रात्री निदर्शनास येताच बँड व्यावसायिक राहुल सदाशिव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तर गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत भूषण प्रकाश पाटील, आर्यन विलास पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, शुभम ज्ञानेश्वर पाटील, विशाल प्रकाश भुसारी, निखिल विनोद पाटील व वैभव रघुनाथ पाटील या सात जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकातील विनोद पाटील, गोपाल माळी, राहुल पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी तसेच एलसीबीचे ईश्वर पाटील व राहुल महाजन यांनी केली. या प्रकरणाचा तपास सुभाष पाटील करत आहेत. दरम्यान, या सर्व ७ जणांना जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.



