छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथे भाचीच्या लग्नाच्या दिवशीच मामाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ पसरली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कल्याण दगडू कलापुरे (वय 48) असून, ते समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण कलापुरे आपल्या लाडक्या भाची पानवी (ता. वैजापूर) च्या लग्नासाठी सज्ज झालेले होते. 24 फेब्रुवारी रोजी रात्री हळदीच्या समारंभानंतर ते उत्तरवाडी येथील घरी परतले. त्यांच्या पत्नी आणि मुले आधीच बहिणीच्या घरी मुक्कामी होत्या, त्यामुळे ते रात्री एकटेच होते. २५ फेब्रुवारी सकाळी लग्नाच्या मुहूर्ताला बहिणीकडे जाण्याची तयारी सुरू असतानाच, सकाळी ९ वाजेपर्यंत कल्याण घराबाहेर न पडल्याने त्यांचे लहान बंधू अरुण कलापुरे त्यांना पाहण्यासाठी गेले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने आणि हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून प्रवेश केला. तेव्हा कल्याण बिछान्यावर निपचित अवस्थेत आढळले.
तातडीने खासगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केले. रात्री घरात कोणीही नसल्यामुळे वेळेवर मदत मिळू शकली नाही, अशी शोकाकुल माहिती गावकऱ्यांनी दिली. भाचीच्या लग्नाच्या दिवशी मामाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच लग्नमंडपात सन्नाटा पसरला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी ४ वाजता उत्तरवाडी येथील शिवना नदीकाठी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्याण कलापुरे दोन विवाहित भाऊ, भावजयी, पत्नी आणि दोन मुलांसह मोठा परिवार सोडून गेले. कर्तव्यदक्ष रुग्णवाहिका चालक आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या कल्याणांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण परिसर दुःखात आहे.


