जळगाव, (प्रतिनिधी )– पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी, तसेच पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक तपासणी करून गॅस सिलेंडरचा अवैध वापर किंवा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास 0257-2223180 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


