जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी जळगाव शहर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर मनोज चौधरी तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार स्मिताताई वाघ यांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तर नंदकिशोर महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित जनहिताचे प्रश्न विधान परिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी नंदकिशोर महाजन हे विकासाचे स्पष्ट व्हिजन असलेले नेतृत्व असल्याचे सांगत त्यांना जळगाव जिल्ह्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला.
या सदिच्छा भेटीमुळे महायुतीमधील समन्वय अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मनपातील राजकीय वातावरण महायुतीमय झाल्याची चर्चा रंगू लागली आहे
Author: K P Chavan
thepubliclive


