जळगाव, दि. २४ : जळगाव जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवासी तथा दादाश्री विश्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना दिव्याज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. सन २०२६ च्या पुरस्कारासाठी डॉ. प्रीतीश चौधरी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे दिनांक २१ जून रोजी भारतीय जैन संघटना आणि दिव्याज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. चौधरी हे दादाश्री विश्व ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहेत. तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. प्रीतीश चौधरी यांनी सांगितले की, “हा सन्मान अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. समाजातील शोषित, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन.”
डॉ. चौधरी यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


