Home » महाराष्ट्र » गिरीश महाजन–विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; एकनाथ खडसेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचा दावा

गिरीश महाजन–विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; एकनाथ खडसेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचा दावा

मुंबई/जळगाव | प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित क्लिपमध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्यात संभाषण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या संभाषणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर झाल्याचा आरोप केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे हे सातत्याने भाजपवर टीका करत असल्याचा उल्लेख असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाबाबतही चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच खडसे कुटुंबीयांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केल्याचेही या कथित क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय मतभेद गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिले आहेत. अशा परिस्थितीत ही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेने किंवा संबंधित व्यक्तींनी पुष्टी केलेली नाही. तसेच गिरीश महाजन किंवा विजय चौधरी यांच्याकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

(महत्त्वाची सूचना : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कथित ऑडिओ क्लिपची पब्लिक लाईव्ह न्यूज स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही. संबंधित यंत्रणांकडून अधिकृत माहिती किंवा प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतरच पुढील घडामोडी स्पष्ट होऊ शकतील.)

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *