जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील लहान-मोठ्या नाल्यांवरील तुटलेले कठडे आणि अनेक ठिकाणी संरक्षक रेलिंग नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे पूर्णपणे तुटले असून शहरातील इतर अनेक ठिकाणीही अशीच धोकादायक परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

या मार्गांवरून दररोज शाळकरी विद्यार्थी, स्कूल बस, रिक्षा आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. तुटलेल्या कठड्यांमुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांना संबंधित ठिकाणांची त्वरित पाहणी करून फॅब्रिकेशनद्वारे तात्पुरती अथवा कायमस्वरूपी संरक्षक रेलिंग उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या ठिकाणी धोका अधिक आहे, त्या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले, “नागरिकांचा, विशेषतः शाळकरी मुलांचा जीव मोलाचा आहे. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी बांधकाम विभागाने तातडीने आणि गांभीर्याने काम हाती घ्यावे.”
दरम्यान, शहरातील धोकादायक ठिकाणांवरील तुटलेल्या कठड्यांची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


