Home » जळगाव » जळगावकरांनी सतर्क राहा! सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट; पुढील ३ तास अतिवृष्टीची शक्यता

जळगावकरांनी सतर्क राहा! सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट; पुढील ३ तास अतिवृष्टीची शक्यता

जळगाव | पब्लिक लाईव्ह न्यूज : जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सलग दुसऱ्या दिवशीही भारतीय हवामान विभागाने (IMD) जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत जिल्ह्यातील काही भागांत मध्यम ते अतिजोरदार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नदी-नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गुरुवारी (दि. ३०) जळगाव शहरात ४७ मिमी पावसाची नोंद झाली. हा यंदाच्या पावसाळ्यात एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस असून, आजही मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रशासनाने नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये, मोकळ्या मैदानात जाणे टाळावे, तसेच नदी, नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, हवामान विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *