जळगाव, दि. १ : जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाळधी–तरसोद बाह्यवळण (बायपास) राष्ट्रीय महामार्गाला पहिल्याच मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसानंतर मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ महामार्ग दोन्ही बाजूंनी दोन ठिकाणी खचल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
महामार्ग खचल्याची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव शहराला वाहतूक कोंडीतून दिलासा देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. मात्र, पहिल्याच मोठ्या पावसात महामार्ग खचल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. रस्त्याच्या बांधकामात आवश्यक दर्जा पाळला गेला होता का, तसेच कामाच्या देखरेखीमध्ये हलगर्जीपणा झाला का, याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर महामार्गाच्या बांधकामाची सखोल तांत्रिक तपासणी करून खचण्यामागील नेमके कारण स्पष्ट करावे, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाकडून या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


