Home » जळगाव » चाळीसगाव » चाळीसगावचा चेहरामोहरा बदलतोय; न्यायालय, प्रशासन, पाणी अन् परिवहन सुविधांना नवी गती

चाळीसगावचा चेहरामोहरा बदलतोय; न्यायालय, प्रशासन, पाणी अन् परिवहन सुविधांना नवी गती

चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना वेग मिळत असून न्यायव्यवस्था, प्रशासकीय सुविधा, आरोग्य, परिवहन, पाणीपुरवठा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांना चालना मिळत असून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे चाळीसगावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याचे आमदार मंगेश चव्हाण सातत्याने सांगतात.

१५० कोटींच्या न्यायालयीन इमारतीला सुरुवात

चाळीसगावच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला मिळालेली मंजुरी. न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून बांधकामाची प्रक्रिया सुरू होत आहे.

यापूर्वी अनेक न्यायालयीन कामांसाठी चाळीसगावकरांना जळगावला जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि कामाचे नुकसान होत होते. आता न्यायालयीन सुविधा चाळीसगावमध्ये उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे प्रशासन नागरिकांच्या जवळ

चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले असून त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच अपेक्षित आहे. हे कार्यालय सुरू झाल्यास महसूल प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

न्यायालय आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय या दोन सुविधांमुळे चाळीसगावचे प्रशासकीय महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पंचायत समितीला आधुनिक प्रशासकीय इमारत

चाळीसगाव तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती आणि १४४ गावांच्या विकासाचे केंद्र असलेल्या पंचायत समितीला आधुनिक प्रशासकीय इमारत मिळाली आहे.

सुमारे ४८६४ चौरस मीटर क्षेत्रावर ९ कोटी ५ लाख रुपये खर्चून ही इमारत उभारण्यात आली आहे. शिक्षण, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार हमी आणि बांधकाम यांसह विविध विभागांसाठी स्वतंत्र कार्यालये, सभागृह आणि प्रशिक्षण हॉल अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत.

प्रांत कार्यालयाला स्वतःची आधुनिक वास्तू

चाळीसगाव प्रांत कार्यालयाला आता स्वतःची आधुनिक इमारत मिळाली आहे. प्रांताधिकारी कार्यालयासोबत प्रांताधिकारी व तहसीलदार निवासस्थानांचीही सुविधा करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी दालन, कोर्टरूम, नायब तहसीलदार कार्यालय, भूसंपादन शाखा, प्रतीक्षागृह तसेच महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांसह विविध सुविधा या वास्तूमध्ये उपलब्ध आहेत.

उपनिबंधक कार्यालयामुळे दस्त नोंदणी सेवा सुलभ

वीर सावरकर चौक परिसरात उभारण्यात आलेले उपनिबंधक कार्यालय वर्ग-२ नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. स्वतंत्र इमारतीत दुय्यम निबंधक दालन, अँटीचेंबर, रेकॉर्ड रूम, कर्मचारी कक्ष आणि नागरिकांसाठी प्रतीक्षालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेषतः रेल्वे स्थानकाच्या पलीकडील भागातील नागरिकांना दस्त नोंदणीची सेवा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १३ कोटींची निवासस्थाने

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी १३ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीतून २५ कर्मचारी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत.

आरोग्य कर्मचारी मुख्यालयी उपलब्ध राहिल्यास आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्पर आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीतून आधुनिक निवासी इमारत उभारण्यात आली आहे.

‘रायगड’ शासकीय विश्रामगृहाची उभारणी

चाळीसगावमध्ये मंत्री, अधिकारी आणि मान्यवरांसाठी ६ कोटी ७२ लाख रुपये खर्चून ‘रायगड’ शासकीय विश्रामगृह उभारण्यात आले आहे.

दोन मजली या इमारतीत वातानुकूलित व्हीआयपी कक्ष, बैठक व्यवस्था, भोजन कक्ष, स्वयंपाकगृह, कर्मचारी कक्ष आणि १५० आसन क्षमतेचे वातानुकूलित सभागृह अशा सुविधा आहेत.

MH-52 नंतर अत्याधुनिक RTO कार्यालय

चाळीसगावला स्वतंत्र MH-52 वाहन नोंदणी ओळख मिळाल्यानंतर आता २६ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम पुढे सरकत आहे.

पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या कार्यालयात वाहन नोंदणी, परवाना, फिटनेस चाचणी, प्रशिक्षण हॉल, डिजिटल सेवा, स्वयंचलित व्हेईकल टेस्टिंग सेंटर तसेच विविध वाहनांसाठी स्वतंत्र ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक असणार आहेत.

पाणीप्रश्नावरही मोठी कामे

चाळीसगाव तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठीही विविध योजना राबविण्यात येत आहेत. गिरणा-जामदा बंधाऱ्यावरून टाकळी प्र. चा. गावासाठी २१ कोटी ३२ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली आहे.

तर रोहिणी आणि परिसरातील १८ गावांचा दीर्घकाळापासूनचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गिरणा धरणावरून सुमारे ४० किलोमीटर अंतरावरून ७५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणण्यात आली आहे. या योजनेमुळे पाणीटंचाईग्रस्त गावांना शाश्वत पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य

विकासकामांसोबत सामाजिक उपक्रमांवरही भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी पंढरपूर वारी, तरुणांसाठी रायगडवारी, अंगणवाडी सेविकांचा सन्मान, मुलींच्या विवाहासाठी मदत, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांना सायकली देण्याच्या उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

कोरोना काळात नागरिकांना भोजन, लसीकरण आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात आली. शेतकरी प्रश्नांवर आंदोलने आणि मोर्चांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याबरोबरच पशुधनासाठी लंपी प्रतिबंधक लसीकरण व चारा छावण्यांसाठीही मदत करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गावागावातील पायाभूत सुविधांवर भर

रस्ते, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालये, तलाठी कार्यालये आणि इतर विविध विकासकामांच्या माध्यमातून ग्रामीण भागाला पायाभूत सुविधांनी सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या सर्व विकासकामांकडे पाहता चाळीसगावचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता प्रशासन, न्यायव्यवस्था, आरोग्य, परिवहन, पाणी आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचवणे, शासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे, या उद्देशाने विविध प्रकल्पांची उभारणी होत आहे.

चाळीसगावला भविष्यात अधिक सक्षम प्रशासकीय आणि सेवा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने ही विकासकामे महत्त्वाची ठरणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून मतदारसंघात सुरू असलेल्या या विकासकामांमुळे चाळीसगावच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चाळीसगावचा बदलता चेहरामोहरा आणि वाढणाऱ्या सुविधा ही या विकासप्रवासाची नवी ओळख ठरत आहे.

— अमित पाटील, जळगाव

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *