जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि तस्करीविरोधात प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली असून, बुधवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी थेट नदीपात्रात उतरून पाहणी केली. दुर्गम भागात दुचाकीवरून, तर काही ठिकाणी पायी जात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध वाळू साठ्यांची पाहणी केली. या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हाधिकारी रोहन घुगे व पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी १८ ऑगस्ट रोजी ज्या-ज्या भागात वाळूसाठे आढळले होते, त्या संपूर्ण परिसराची बुधवारी पाहणी केली. या भागात कुठे नव्याने वाळूचा उपसा झाला आहे का, तसेच वाळू लपवून ठेवण्यात आली आहे का, याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री केली.

या पाहणीदरम्यान तहसीलदार शीतल राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचा ताफा उपस्थित होता. बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम तीव्र केली आहे.
ग्रामस्थांशी साधला संवाद
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कानळदा, खेडी आणि आवार या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. नदीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशाबाबत गावकऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली.
गावात किंवा नदीकाठी संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. अवैध वाळू उपसा आणि तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नदीपात्रावर प्रशासनाची करडी नजर
जिल्ह्यातील वाळू उपशाच्या ठिकाणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः नदीपात्रात उतरून पाहणी केल्याने प्रशासन आता प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे चित्र आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


