Home » जळगाव » ईद-ए-मिलादसाठी जळगाव पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ५,६०४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

ईद-ए-मिलादसाठी जळगाव पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ५,६०४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक सुरक्षा नियोजन केले आहे. सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी जळगाव पोलिस मुख्यालयात शांतता समितीचे सदस्य आणि मिरवणूक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच उपविभागीय दंडाधिकारी (SDM) प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.

मिरवणुकीसाठी पूर्वपरवानगी आवश्यक

पोलिस प्रशासनाने मिरवणूक आयोजकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मिरवणूक काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक काढू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासन आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या मिरवणूक मार्गात कोणताही बदल करू नये. मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी, घोषणा किंवा वक्तव्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित करू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

परदेशी राष्ट्रांचे ध्वज वापरण्यास मनाई

मिरवणुकीदरम्यान परदेशातील राष्ट्रांचे झेंडे अथवा अन्य वादग्रस्त ध्वज वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिरवणुकीमध्ये झेंडे फिरविणे टाळावे, कारण त्यातून अनावश्यक वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी संयम बाळगावा, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल

मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी परिस्थितीनुसार वाहतूक मार्गात तात्पुरते बदल किंवा डायव्हर्शन करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या काळात पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेला मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ते स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबतही संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

५,६०४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

पोलिसांच्या नियोजनानुसार बंदोबस्तासाठी एकूण ५,६०४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक १, अपर पोलीस अधीक्षक २, SDPO १०, प्रोबेशनरी DySP २, पोलीस निरीक्षक ३०, API/PSI २००, पोलीस अंमलदार ३,४००, RCP ८, स्ट्रायकिंग फोर्स १५, होमगार्ड १,६००, वाहतूक शाखा १००, SRPF कमांडो २००, BDDS पथक २, डॉग युनिट ४, कंट्रोल रूम मॉनिटरिंग १५ आणि सोशल मीडिया/सायबर मॉनिटरिंगसाठी १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जिल्ह्यात ५,००० पेक्षा अधिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचेही प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

सोशल मीडिया आणि सायबर मॉनिटरिंग

सणाच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. धार्मिक भावना दुखावणारे, आक्षेपार्ह किंवा वाद निर्माण करणारे पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा संदेश प्रसारित होऊ नयेत यासाठी सोशल मीडिया आणि सायबर मॉनिटरिंग करण्यात येणार आहे.

मिरवणूक तसेच गर्दीच्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची तयारीही पोलिस प्रशासनाने केली आहे.

संवेदनशील भागात रूट मार्च

संवेदनशील आणि महत्त्वाच्या भागांमध्ये रूट मार्च घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दंगल नियंत्रण पथक तसेच रिझर्व्ह फोर्स सज्ज ठेवण्यात येणार आहे.

यासोबतच DJ संदर्भात संबंधित पदाधिकारी आणि आयोजकांची स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.

विविध विभागांशी समन्वय

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर MSEDCL, PWD, आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक उपाययोजनांसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, धोकादायक वायरिंगची पाहणी, मिरवणूक मार्गावरील रस्ते व अतिक्रमणांची व्यवस्था, आरोग्यविषयक सुविधा आदी बाबींवर संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

ईद-ए-मिलादचा सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासन, पोलिस तसेच विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात आला असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *