जळगाव : शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींविरोधात जळगाव पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत पोलिसांनी २६ मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली नष्ट केले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विशेष कारवाई करण्यात आली. कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवरील २६ मॉडिफाइड सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले. २५ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ताब्यात घेतलेल्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांचा नाश करण्यात आला.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
कंपनीच्या मूळ स्वरूपात बदल करून बसविण्यात आलेले मॉडिफाइड सायलेन्सर वापरू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कंपनीने निर्धारित केलेले मूळ सायलेन्सरच वापरावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कारवाई यापुढेही सुरू राहणार
कर्कश आवाज करणाऱ्या किंवा कंपनीच्या मूळ स्वरूपात बदल करून बसविलेल्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या वाहनांवर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जळगाव पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या पथकाने केली.
“कर्कश आवाज नाही—शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगाव हवे! वाहतूक नियम पाळा, ध्वनिप्रदूषण टाळा आणि नागरिकांचा त्रास टाळा,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


