Home » जळगाव » अमळनेर » टाकरखेड्यात हृदयद्रावक घटना; दोन मुलांसह पती-पत्नीचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत

टाकरखेड्यात हृदयद्रावक घटना; दोन मुलांसह पती-पत्नीचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत

अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत असलेले दोन मुले सनी आणि राज यांना सोबत घेत पहाटेच्या सुमारास घर सोडले. त्यानंतर चौघांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवन संपविले. या घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *