Home » जळगाव » जळगावात महामार्गावर प्रशासनाचा दणका; अतिक्रमण, बेशिस्त पार्किंगवर धडक कारवाई

जळगावात महामार्गावर प्रशासनाचा दणका; अतिक्रमण, बेशिस्त पार्किंगवर धडक कारवाई

जळगाव : बायपासवरील उड्डाणपुलाचा भराव खचल्याने गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होत असून, अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने गुरुवारी महामार्ग मोकळा करण्यासाठी धडक मोहीम राबवली.

बुधवारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी केली होती. यावेळी रस्त्यावर उभी असलेली वाहने, अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाईचे पाऊल उचलले.

गुरुवारी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. इच्छादेवी चौकातून सुरू झालेली कारवाई कालिंका माता चौफुलीपर्यंत करण्यात आली. तब्बल साडेचार तास ही कारवाई सुरू होती.

या मोहिमेदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि मनपा उपायुक्त पंकज गोसावी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली.

महामार्गावर बेशिस्तपणे उभी केलेल्या वाहनांवर नो-पार्किंगची कारवाई करत दंड आकारण्यात आला. तसेच रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. फळे, फुले आणि रोप विक्रेत्यांचे साहित्य हटविण्यात आले असून, पक्क्या टपऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

बायपासवरील वाहतूक बंद असल्याने शहरातील महामार्गावर वाहनांचा वाढलेला ताण लक्षात घेता या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंग हटविल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *