जळगाव | नाशिक येथे रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने जळगाव बायपासवर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शांताराम केशव पाटील (५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत.
ही घटना ३१ ऑगस्ट रोजी असोदा ते ममुराबाददरम्यानच्या बायपासवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनातून ईश्वर महाजन यांना उपचारासाठी नाशिकला नेण्यात येत होते. बायपासचा एक मार्ग बंद असल्याने वाहन दुसऱ्या बाजूने जात असताना पाळधीकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचार सुरू असताना शांताराम केशव पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसांनी ट्रकचालक सतीश ढिल्लो याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.
Author: K P Chavan
thepubliclive


