September 11, 2026 5:16 pm

Home » महाराष्ट्र » ढोल-ताशांचा गजर, आदिवासी नृत्य अन् मल्लखांबचा थरार; जैन हिल्सवर पोळा उत्सवाची धूम

ढोल-ताशांचा गजर, आदिवासी नृत्य अन् मल्लखांबचा थरार; जैन हिल्सवर पोळा उत्सवाची धूम

जळगाव | प्रतिनिधी : जैन हिल्सवर यंदाचा पोळा सण पारंपरिक उत्साह, जल्लोष आणि सांस्कृतिक रंगांनी अक्षरशः बहरला. ढोल-ताशांचा गजर, सजलेल्या वृषभराजांची भव्य सवाद्य मिरवणूक, आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य, विद्यार्थ्यांची लेझीमवर गणेशवंदना आणि मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

जैन इरिगेशनच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाच्या वतीने पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

वृषभराजांची दिमाखदार मिरवणूक

पोळ्यानिमित्त बैलांना रंगीबेरंगी सजावट, आकर्षक झूल आणि पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले होते. अशोक जैन, ज्योती जैन, निशा जैन, शोभना जैन आणि डॉ. भावना जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात वृषभराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या स्मृतिस्थळ ‘श्रद्धा ज्योत’ येथे अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मारुती मंदिराचे दर्शन घेत मिरवणूक सरस्वती पॉईंट, गुरुकुल पार्किंग मार्गे हेलीपॅड मैदानावर पोहोचली.

 

मान्यवरांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून पोळा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

आदिवासी नृत्याने जिंकली मने

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जंगल परिसरातून आलेल्या ३५ आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक होळी नृत्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेतील या नृत्यातून आदिवासी लोकसंस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले.

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर गणेशवंदना सादर करत वातावरण मंगलमय केले. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

यानंतर एकलव्य ग्रुपच्या ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मल्लखांबच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले. धाडस, चपळता, कौशल्य आणि आत्मविश्वासाचा सुरेख मिलाफ या प्रात्यक्षिकांतून पाहायला मिळाला.

पोळा फोडण्यात चिंटू गोंड अव्वल

पोळा फोडणाऱ्या सालदारांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही रोख पारितोषिके देण्यात आली. एकूण २० हजार रुपयांची रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

भाऊंची सृष्टी येथील सालदार चिंटू नवलसिंग गोंड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गोशाळेचे सालदार वाल्मिक शिंदे यांनी द्वितीय, तर जैन सोसायटीचे सालदार सुरेश गरेसिंग पावरा यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

वर्षभर शेतात राबणाऱ्या सालदारांचा गौरव

जैन इरिगेशनच्या कृषी विभागात वर्षभर विविध ठिकाणी शेतात मेहनत करणाऱ्या सालदारगडींचा यावेळी भेटवस्तू देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक सौरेश सहाय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

परंपरा आणि आधुनिकतेचा संगम

 

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांनी पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्याची परंपरा सुरू केली. आधुनिकतेचा स्वीकार करताना नव्या पिढीचे भारतीय कृषीपरंपरा आणि संस्कृतीशी नाते कायम राहावे, तसेच शेतीमध्ये बैलांचे असलेले महत्त्व समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

यंदाच्या पोळा उत्सवातून कृषीसंस्कृती, आदिवासी लोककला, पारंपरिक खेळ आणि आधुनिक शिक्षण यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

किशोर कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!