पब्लिक लाईव्ह न्यूज ।चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवझिरी गावातील शेतशिवारात पोलिसांनी छापा टाकून गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली. या कारवाईत देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवझिरी गावातील शेतशिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने आज, ८ सप्टेंबर रोजी, संबंधित शेतात कारवाई केली.

पोलिस पथकाने शेताची पाहणी केली असता तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी गांजाची एकूण १७५ झाडे जप्त केली. या प्रकरणी देवसिंह बरेला याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, गांजाची लागवड करण्यात आलेले शेत मध्य प्रदेशाच्या सीमेलगतच्या परिसरात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भागात अमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गांजाच्या अवैध लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


