Home » राष्ट्रीय » २४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट : १४ जणांचा मृत्यू !

२४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट : १४ जणांचा मृत्यू !

अहमदाबाद : वृत्तसंस्था

देशातील गुजरात राज्यात सोमवारी आकस्मिक पावसाने हाहाकार माजवला असून, गेल्या २४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील तीन दिवसांत राज्याच्या ७५ टक्क्यांहून अधिक भागात मुसळधार पाऊस आणि ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. बनासकांठा, कच्छ, साबरकांठा, अरावली आणि आनंद जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (एसईओसी) नुसार, गुजरातमधील २५३ तालुक्यांपैकी १६८ तालुक्यांत सोमवारी पाऊस झाला. खेडा, गांधीनगर, मेहसाणा आणि वडोदरा जिल्ह्यांत २५ ते ४० मिमी पावसाची नोंद झाली. अहमदाबाद, आनंद, खेडा, दाहोद, अरावली आणि वडोदरा जिल्ह्यांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला, तर रविवारी अहमदाबादच्या विरमगाममध्ये विजेच्या कडकडाटात एकाचा मृत्यू झाला. खेडा जिल्ह्यात चार, वडोदरात तीन, अहमदाबाद, दाहोद आणि अरावलीत प्रत्येकी दोन, तर आनंदमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. झाडं कोसळणे, होर्डिंग पडणे, विजेचा धक्का लागणे आणि दुकान कोसळणे यामुळे हे मृत्यू झाले.

आयएमडीने पुढील काही दिवसांत तीव्र वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे काही भागांत तापमानात ३ ते ५ अंश सेल्सियसची घट होण्याची शक्यता आहे. आयएमडीने १५ जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं, होर्डिंग आणि विजेचे खांब कोसळले, तर काही घरे उद्ध्वस्त झाली. यामुळे अनेक जण जखमी झाले. राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *