September 7, 2026 6:55 pm

Home » जळगाव » ब्रेकिंग न्यूज: वसंतवाडी तांड्यात धक्कादायक घटना! सोलर पॅनल कोसळून चिमुकला जखमी; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

ब्रेकिंग न्यूज: वसंतवाडी तांड्यात धक्कादायक घटना! सोलर पॅनल कोसळून चिमुकला जखमी; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

जळगाव प्रतिनिधी दि.७ : वसंतवाडी तांडा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेले सोलर पॅनल अचानक कोसळल्याने परिसरात खेळत असलेला सहा वर्षीय चिमुकला जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेत विराट प्रकाश राठोड (वय ६ वर्षे) याच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
सोलर पॅनलखाली अडकले दोन्ही पाय
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेले सोलर पॅनल अचानक कोसळले. त्यावेळी परिसरात खेळत असलेल्या विराटचे दोन्ही पाय पॅनलच्या स्ट्रक्चरखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कामाच्या दर्जावर ग्रामस्थांचे प्रश्न
या घटनेनंतर सोलर पॅनलच्या उभारणीच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पॅनलचे स्ट्रक्चर योग्य आणि सुरक्षित पद्धतीने उभारण्यात आले होते का, तसेच कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती देण्यासाठी काही ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे सांगण्यात येते. मात्र, “ग्रामपंचायतच्या सोलरशी आमचा कोणताही संबंध नाही,” असे उत्तर मिळाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
सोलर पॅनल नेमके कोणी बसवले?
घटनेनंतर ग्रामस्थांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सदर सोलर पॅनल नेमके कोणी बसवले? त्यासाठी निधी कुठून उपलब्ध झाला? कामाला मंजुरी कोणी दिली? कामाची पाहणी व गुणवत्ता तपासणी करण्यात आली होती का? तसेच पॅनल कोसळण्यामागील नेमके कारण काय आहे, याची अधिकृत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाकडून चौकशीची मागणी
सहा वर्षीय चिमुकल्याला दुखापत झाल्याने प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित यंत्रणेने घटनास्थळी पाहणी करून सोलर पॅनलची उभारणी, स्ट्रक्चरची सुरक्षितता आणि कामाची गुणवत्ता तपासावी. चौकशीत निष्काळजीपणा अथवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे वसंतवाडी तांडा परिसरात खळबळ उडाली असून, सोलर पॅनलच्या कामाबाबत प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि या प्रकरणात जबाबदारी निश्चित होते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!