September 9, 2026 5:47 pm

Home » जळगाव » समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात; ‘रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट’चा दिमाखात शुभारंभ

समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात; ‘रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट’चा दिमाखात शुभारंभ

जळगाव (पब्लिक लाईव्ह) : समाजसेवेच्या माध्यमातून जळगाव शहर व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. जळगाव शहरातील रोटरीच्या भैय्यासाहेब नथमलजी लुंकड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रोटरी असिस्टंट गव्हर्नर ॲड. सागर चित्रे, माजी प्रांतपाल डॉ. सिकची, नाना शेवाळे, राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते रोहित आहुजा यांनी रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टच्या चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा स्वीकारली. तसेच धनराज कासट व पुनीत तरलेजा यांनी चार्टर सेक्रेटरीपदाची जबाबदारी स्वीकारली.

नव्या कार्यकारिणीची निवड

चालू वर्षासाठी क्लबच्या Board of Directors (BoD) ची निवडही यावेळी करण्यात आली. यामध्ये ट्रेझरर सीए सौरभ शाह, व्हाईस प्रेसिडेंट सरिता झावर यांच्यासह पूनम वर्मा, योगेश सांखला, निकुंज अग्रवाल, विनीत आहुजा, दर्शन जैन, पराग बेदमुथा, मयूर ओसवाल, तुषार भांबरे, प्रकाश मुळे आणि डॉ. महेंद्र मल्ल यांचा समावेश आहे.

गणापुरे, प्रतापराव पाटील यांना मानद सदस्यत्व

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले.

६२ सदस्यांसह क्लबची वाटचाल

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून क्लबची सदस्यसंख्या ६२ झाली आहे. यामध्ये ११ महिला सदस्यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांतील सदस्य एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी योगदान देणार आहेत.

आगामी काळात जळगाव शहर व परिसरातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्याचा मानस क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला. गरजू व्यक्तींना मदत करण्यासोबतच समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत सेवाकार्य पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

नव्या क्लबच्या माध्यमातून जळगावच्या सामाजिक क्षेत्रात प्रभावी योगदान देत सेवा, मैत्री आणि सामाजिक बांधिलकीची नवी दिशा निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!