जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक पदाधिकारी विनोद देशमुख यांना तीन वर्षांपूर्वीच्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक मंगळवारी (२३ सप्टेंबर) रात्री उशिरा रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी आरोपींनी वाणी यांना जीव घेण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या प्रकरणी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊनही अटक लांबणीवर पडत होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. अखेर मंगळवारी रात्री देशमुख यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. अटक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. देशमुख हे अजित पवार यांच्या गटातील सक्रिय पदाधिकारी असल्याने या घटनेचे राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.



