जळगाव : प्रतिनिधी
ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील एका डॉक्टरची तब्बल २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील ४८ वर्षीय डॉक्टर हे फेसबुकवर नियमित सक्रिय असतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना अंकिता देसाई नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी त्यांनी स्वीकारली. या महिलेने डॉक्टरांना ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस नावाची एक कंपनी असून, त्यात पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. अंकिता देसाईने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामद्वारे डॉक्टरांना संपर्क साधला. तिने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितले. सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवून वेबसाईट्स आणि हॉटेल्सना ५ स्टार रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. प्रत्येक टास्क पूर्ण झाल्यावर भरलेल्या रकमेवर ०.२५ टक्के नफा मिळेल, असे सांगितले.
९ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी त्यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये पाठविले केले. त्यानंतर त्यांना अॅपमध्ये ९०० रुपयांचा नफा दिसला, ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला. यानंतर वारंवार टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर त्यांनी वेळोवेळी एकूण २७ लाख २५ हजार ६३० रुपये भरले, अॅपमध्ये त्यांना ३६ लाख ८२ हजार २७५ रुपये नफा झाल्याचे दिसत होते. जेव्हा डॉक्टरांनी भरलेली मूळ रक्कम आणि झालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते शक्य झाले नाही. त्यांनी अंकिता देसाईशी संपर्क साधला असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आणखी पैशांची मागणी करू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी २९ ऑक्टोबर रोजी सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली आहे.



