नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडत असताना, 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. हा निकाल आता रविवारी, 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून तोपर्यंत राज्यात आचारसंहिता कायम राहणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या न्यायालयीन वादामुळे आयोगाने वेळापत्रकात बदल करत, ज्या ठिकाणी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, तेथे 20 डिसेंबर रोजी मतदान व 21 डिसेंबरला मतमोजणी होईल, असा नवा आदेश काढला. या बदलामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अधिक गुंतागुंत निर्माण झाली.
याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत 3 डिसेंबरची मतमोजणी रद्द केली आहे. आता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल एकाच दिवशी — 21 डिसेंबरला — जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच त्या दिवसापर्यंत राज्यात आचारसंहिता लागूच राहणार आहे.
सोमवारच्या सुनावणीत खंडपीठाने थेट निवडणूक आयोगाच्या वकिलांना विचारणा केली होती की, “सर्वच संस्थांचे निकाल 21 डिसेंबरलाच देता येतील का?” या प्रश्नामुळे निवडणूक प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. त्यानंतर आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात निवेदन सादर केले आणि अखेर न्यायालयाने सर्वच ठिकाणच्या मतमोजणीला एकच तारीख निश्चित केली आहे.



