भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील रजा टॉवर चौकात भरदुपारी किरकोळ वादातून चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगा व एक तरुणावर वार करण्यात आल्याने दोघे जखमी झाले आहेत. जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रजा टॉवर चौकात एक तेरा वर्षीय मुलगा आणि एका तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर हा वाद अचानक उम्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी अज्ञात व्यक्तीने संतापाच्या भरात तेरा वर्षीय मुलाच्या डाव्या कानाजवळ चाकूने जोरदार वार केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या आणखी एका तरुणालाही लक्ष्य करण्यात आले. त्याच्या डाव्या मांडीवर चाकूने वार करण्यात आल्याने तोही गंभीर जखमी झाला.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांनी सांगितले की १३ वर्षीय मुलाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. दुसऱ्या जखमी तरुणावर भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. शहरात अशा घटना वाढत असून आळा घालण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दोन्ही जखमी उपचाराधीन असल्यामुळे त्यांचे जबाब नोंदविणे शक्य झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. भरदिवसा आणि गजबजलेल्या चौकात घडलेल्या या चाकूहल्ल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.



