पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील एका लॉजच्या ३८ वर्षीय मॅनेजरने एम.आय.डी.सी. कॉलनीतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १ जुलैला सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील गिरड येथील मूळ रहिवासी व सध्या पाचोरा येथील एमआयडीसी कॉलनीत राहणारे वाल्मीक बाळकृष्ण पाटील (वय ३८) असे गळफास घेतलेल्या तरुणाने नाव आहे. वाल्मीक पाटील यांनी एमआयडीसी कॉलनीतील घरात गळफास लावून आत्महत्या केली. वाल्मीक पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पाचोरा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर वाल्मीक पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.



