जळगाव : प्रतिनिधी
भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वंदना सुनील गुजराथी (४९, रा. पार्वतीनगर) या महिलेचा शुक्रवारी दि.२० जून रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोंटू शिवपाल सैनी (२६, रा. वाघ नगर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, वाघ नगरमधील मोंटू सैनी हा तरुण गुरुवारी (१९ जून) रात्री महाबळ परिसरातून कार (क्र. एमएच १९, ईपी १६९४) घेवून भरधाव वेगाने जात होता. त्या वेळी या परिसरातील खासगी क्लासेस जवळ त्याने अनेक वाहनांना धडक दिली होती. यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले. त्यानंतर काही अंतरावर कारचालकाने वंदना गुजराथी या महिलेला धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, सैनी याला नागरिकांनी पकडून रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
त्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातप्रकरणी मोंटू सैनी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळ परिसरात भरधाव कारचा एवढा थरार होता की, तिचा वेग व वाहनांना उडवित जाण्याचे चित्र पाहून परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. ही भरधाव कार येत असल्याचे दिसताच एका दुचाकीस्वाराने बाजूला उडी घेतली. त्यामुळे तो बालंबाल बचावला. चालक एकापाठोपाठ अनेक वाहनांना उडवित गेला व अनेक जण जखमी झाले.



