जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद सोनवणे (वय ४०, रा. पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मंगळवार (दि. १७ डिसेंबर) रोजी विनोद सोनवणे यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



