चोपडा : प्रतिनिधी
अवैध वाळूची वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर रविवारी पहाटे वाळूतस्करांनी हल्ला केला. यात मंगरूळचे ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकून मागील चाक त्यांच्या अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न झाला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना बाहेर ओढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही थरारक घटना बुधगाव-जळोद (ता. चोपडा) रस्त्यावर घडली. ट्रॅक्टरचालक विजय पावरा आणि मालक अजय कैलास कोळी (दोघे रा. बुधगाव, ता. चोपडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली मंगरूळचे ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, वर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सुधाकर महाजन, अकुलखेडेचे तिलेश पवार आणि बुधगावचे भूषण पवार यांच्या पथकाला बुधगावनजीक वाळूने भरलेला ट्रॅक्टर दिसला. पथक ट्रॅक्टर चोपडा तहसील कार्यालयाकडे नेत असताना विजय पावरा आणि अजय कोळी यांनी रस्त्यात वाद घातला. पावराने ट्रॅक्टरवर बसलेले अनंत माळी यांना खाली ओढत ट्रॅक्टरच्या मागील चाकाच्या समोर फेकले. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी प्रसंगावधान राखत अनंत माळी यांना बाजूला ओढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, त्यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. याच वेळी चालक व मालकाने वाळू ओतून ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढला
