नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शक्य तेथे महायुती केली जाईल. जेथे तुल्यबळ परिस्थिती असेल तेथे मैत्रीपूर्ण लढती करू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले होते. आगामी निवडणुकांमध्ये त्यापेक्षाही अधिक चांगले यश मिळेल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक शुक्रवारी (दि. १०) पंचवटीतील स्वामी नारायण कन्व्हेक्शन सेंटर येथे पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्ताने विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्या-त्या विभागांमधील जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, आणि महापालिकांसंदर्भात आढावा घेतला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी संघटनात्मक परिस्थिती, बुथ रचना, मागील निवडणुकांमधील परिस्थिती, युती कशी व कुठे होऊ शकते, अशा सर्व गोष्टींचा आढावा घेतला जात असून पुढील मार्गदर्शन केले जात आहे. आज आम्ही उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला. या निवडणुकांबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले. त्यांना पुढील दिशादर्शन देखील करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले होते. यावेळी त्याहीपेक्षा अधिक चांगले यश मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.
