पुणे : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचे चित्र दिसत असल्याचे कुठलीही स्थिती नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा सुरू आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.

या आरक्षणाबाबत केवळ मुख्यमंत्री फडणवीस हेच बोलत आहेत. परंतु, दोन्ही उपमुख्यमंत्री शांत असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी मराठा आरक्षण प्रश्नी फडणवीस एकाकी नसल्याचे भाष्य केले.आंदोलना संदर्भात पवार म्हणाले की, याबाबत राज्य सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारची भूमिका सकारात्मक आहे.
यातून मार्ग निघाला पाहिजे हिच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्हा उपमुख्यमंत्र्यांची आहे. या समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांच्या समितीतील सर्व सदस्य बसून चर्चा करतील. चर्चेतून मार्ग निघू शकतो, आजवरचा अनुभव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जे कोणी आंदोलन करतात ती त्यांची भूमिका मांडत असतात. लोकशाहीत संविधानाने त्यांना तो हक्क दिला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही त्यातून मार्ग काढण्याकरिता सरकार वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करीत आहे. हे सगळे सामोपचाराने मिटेल, उपोषण कसे संपेल हा प्रश्न राज्य सरकार करीत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
मराठा आरक्षण प्रश्नावर जे कोणी काही सूचना करतात ते दहा-दहा वर्ष सरकारमध्ये होते. उगीचच आम्हाला त्या खोलात जायला लावू नका. ते सर्व आदरणीय, पूजनीय, वंदनीय मान्यवर आहेत. मला त्याबद्दल खोलात जायचं नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली.



