Home » महाराष्ट्र » फडणवीसांची सभा, तरीही जयंत पाटील विजयी; ईश्वरपूर निकालाची राज्यभर चर्चा ; व्हायरल झाले पोस्टर्स

फडणवीसांची सभा, तरीही जयंत पाटील विजयी; ईश्वरपूर निकालाची राज्यभर चर्चा ; व्हायरल झाले पोस्टर्स

सांगली : वृत्तसंस्था

राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,” या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालातून आली असून, या वाक्याचे बॅनर्स व पोस्टर्स शहरभर झळकू लागले आहेत.

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपासह महायुतीने मोठी रणनीती आखली होती. दिग्गज नेत्यांच्या सभा, मोठी फौज आणि आक्रमक प्रचाराच्या माध्यमातून जयंत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तब्बल २३ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांची सर्व गणिते कोलमडून टाकली.

या निकालानंतर ईश्वरपूर शहरासह राजारामबापू सहकारी साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर्स व फलक झळकू लागले आहेत. “सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही” हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत असून, हे फलक सध्या सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांकडून जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या खालच्या पातळीच्या टीकेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी या बॅनर्समधूनच प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

ईश्वरपूर नगरपरिषदेत एकहाती सत्ता मिळवत जयंत पाटील यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती, तरीही निकाल जयंत पाटील यांच्या बाजूने लागल्याने या विजयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विजयानंतर ईश्वरपूर शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी जयंत पाटील आणि त्यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत विजयाचा शड्डू ठोकला. तसेच जयंत पाटील यांनी आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन विजय साजरा केल्याचा क्षणही उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निकालाने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले असून, या विजयाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *