Home » राष्ट्रीय » पाच मृतदेह, पण मृत्यू सहा जणांचा? अजित पवार विमान अपघातावर प्रश्नचिन्ह

पाच मृतदेह, पण मृत्यू सहा जणांचा? अजित पवार विमान अपघातावर प्रश्नचिन्ह

मुंबई : वृत्तसंस्था

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले, तसेच त्यांना वाचवण्यासाठी जात असतानाच मोठा स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. तसेच या अपघातात प्रथम सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र घटनास्थळी पाचच मृतदेह सापडले. मग सहावा व्यक्ती नेमका कोण होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार यांचे गत बुधवारी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने राज्याच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते अद्याप या घटनेतून सावरलेले नाहीत. आमदार अमोल मिटकरी यांनी बुधवारी पुन्हा एकदा या अपघातावर नवा दावा करत सखोल चौकशीची मागणी केली.

मिटकरी यांनी सांगितले की, अजित पवारांचा मृत्यू झाला त्या दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता ते घटनास्थळी गेले होते. त्यावेळी गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी त्यांना धक्कादायक माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत असल्याचे त्यांनी पाहिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी विमानाच्या दिशेने जात असतानाच अचानक मोठा स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या अपघातानंतर सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ विमानात सहा जण प्रवास करत होते. मात्र प्रत्यक्षात घटनास्थळी पाचच मृतदेह आढळून आले. त्यामुळे सहावा व्यक्ती कुठे गेला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनीही या अपघाताबाबत वेगळा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, विमान अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असून अपघातावेळी विमानाचा दरवाजा उघडा होता. निळी पॅन्ट घातलेला एक व्यक्ती बाहेर येतोय, असे सुरुवातीला वाटले, मात्र नंतर तसे काही दिसले नाही. हे विमान अजित पवार यांचे आहे, याची कल्पनाही आपल्याला नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरपंच आटोळे यांनी ही माहिती शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही दिल्याचे सांगितले आहे. अपघातापूर्वी विमानाने आकाशात दोन घिरट्या घातल्या आणि त्यानंतर खाली येत असताना हा अपघात झाला, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त करत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून, हे प्रकरण आणखी गंभीर बनत चालले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *