Home » महाराष्ट्र » शिवरायांच्या जन्मोत्सवी सोहळ्यात शासनाची किल्ले संवर्धनाची ठाम भूमिका ; मुख्यमंत्री !

शिवरायांच्या जन्मोत्सवी सोहळ्यात शासनाची किल्ले संवर्धनाची ठाम भूमिका ; मुख्यमंत्री !

जुन्नर : वृत्तसंस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जन्मोत्सवानिमित्त शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्याच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला.

शिवजन्मभूमीवरून बोलताना फडणवीस यांनी इतिहास, स्वराज्य आणि किल्ल्यांच्या जतनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोल वेगळा असता,” असे ठाम विधान त्यांनी केले. ज्या काळात अनेक राजे मोगलांच्या अधिपत्याखाली होते, त्या वेळी राजमाता जिजाबाई यांनी शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली. हिंदुस्थानाला मोगलांच्या जोखडातून मुक्त करून ‘रयतेचे राज्य’ स्थापन करण्याची शिकवण त्यांनी दिली, असे फडणवीस म्हणाले.

अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून उभी केलेली फौज ही स्वराज्याची खरी ताकद ठरली. “हे राज्य माझे नसून रयतेचे आहे,” हा शिवरायांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. देव, देश आणि धर्मासाठी लढण्याची शिकवण शिवरायांनी दिली, यावरही त्यांनी भर दिला.

मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या अद्वितीय दूरदृष्टीवर प्रकाश टाकताना सांगितले की, समुद्रमार्गे शत्रू येऊ शकतो हे ओळखणारे ते पहिले राजे होते. पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणासाठी जलदुर्ग उभारण्याचा निर्णय त्यांच्या लष्करी दृष्टीकोनाचे प्रतीक होता. पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही आक्रमकाला समुद्रमार्गे येण्याची हिंमत झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ऐतिहासिक किल्ल्यांच्या जतनाबाबत महत्त्वाची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामनिर्देशित झाले असून जगातील 27 देशांनी त्यास एकमताने मान्यता दिली आहे. हा सन्मान केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांचा वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, अजितदादांना शिवनेरी किल्ल्याबद्दल विशेष प्रेम होते. शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त झाले असून एकाही किल्ल्यावर आता अतिक्रमण शिल्लक नाही, असे त्यांनी जाहीर केले. हा निर्णय अजित पवार यांच्या इच्छेनुसार पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

2030 साली छत्रपती शिवाजी महाराजांची 400 वी जयंती राज्यभर भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्या निमित्ताने विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि संवर्धनात्मक उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिवनेरीवर पार पडलेल्या या सोहळ्यात इतिहासाचा अभिमान आणि भविष्यातील संकल्प यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. स्वराज्याची प्रेरणा, किल्ल्यांचे संवर्धन आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याची राज्याची बांधिलकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा अधोरेखित केली. उपस्थितांमध्ये या घोषणांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवनेरीवरून दिलेला संदेश कृतीतूनही दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *