जळगाव : प्रतिनिधी
एका डाळ व्यापाऱ्याची ३६ लाखांहून अधिक रुपयांत दलाल व तीन व्यापाऱ्यांनी संगनमताने फसवणूक केली आहे. पोलिसांनी १० सप्टेंबरला एका संशयिताला अटक केली आहे. याबाबत सक्षम उद्योगाचे मालक व डाळ प्रक्रिया उद्योजक विनोदकुमार चंचलचंद जैन (वय ४१) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, बालाजी ट्रेडिंगचा दलाल सूर्यकांत उर्फ राज संजय व्यास याने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. व्यासने जैन यांना किशोर ट्रेडर्सचे किशोर पुरोहित, आयुष ट्रेडर्सचे दीपक व्यास, विष्णुकांत पुरोहित ट्रेडर्सचे श्रीकांत पुरोहित यांना मोठ्या प्रमाणात डाळ हवी असल्याचे सांगितले.
त्यानुसार या व्यवहाराला सुरुवात झाली. दलालाच्या सांगण्यावरून जैन यांनी २८ जानेवारी २०२४ रोजी आयुष ट्रेडर्सला ४ लाख ३८ हजार ६० रुपयांची मूग डाळ पाठवली. १ फेब्रुवारी रोजी पुन्हा ६ लाख ८० हजार रुपयांचा माल पाठवला. संशयितांनी मालाचे पैसे १०-१२ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. दीपक व्यासने ६ लाख ६३ हजार रुपयांचा चेक दिला. पण, खात्यात पुरेसे पैसे नसल्याने तो बाउन्स झाला. यानंतर, संशयितांनी पुन्हा ४ लाख ४७ हजार रुपयांची डाळ मागवली. जैन यांना ३६ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा माल देऊनही त्याचे पैसे मिळाले नाहीत. जैन यांनी पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी, पैसे मिळणार नाहीत, जे होईल ते करून घे, अशी धमकी दिली. जैन यांनी १० सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी किशोर मिठालाल पुरोहित याला १० सप्टेंबर रोजी अटक केली आहे.



