Home » जळगाव » जळगाव महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला; कचरा संकलनात थेट घोटाळा

जळगाव महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला; कचरा संकलनात थेट घोटाळा

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील कचरा संकलनाच्या नावाखाली महापालिकेची थेट फसवणूक करणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. निमखेडी शिवारातील कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात शुक्रवारी एका ट्रॅक्टरमधून कचऱ्याऐवजी माती व बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला. केवळ घराघरातून संकलित होणारा ओला व सुका कचरा आणण्याचा स्पष्ट नियम असताना, मक्तेदाराने नियम धाब्यावर बसवून वजन वाढवण्याचा घाणेरडा डाव खेळल्याचे स्पष्ट झाले आहे.

कचऱ्याच्या तुलनेत मातीचे वजन अनेक पटींनी जास्त असल्याने, जास्त वजन दाखवून महापालिकेकडून फुगवलेले बिल उचलण्याचा हेतू असल्याचा संशय नाही, तर तथ्य समोर आले आहे. प्रत्यक्ष कचरा संकलनाच्या कामाऐवजी कंत्राटदाराने माती वाहतुकीचा व्यवसायच सुरू केल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

हा प्रकार निदर्शनास येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत ट्रॅक्टर थांबवला व साहित्याची पाहणी केली. प्राथमिक तपासात नियमभंग स्पष्ट झाला असून, संबंधित मक्तेदाराविरोधात दंडात्मक कारवाई, फसवणुकीचा गुन्हा नोंदवणे तसेच कंत्राट रद्द करण्याची शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांच्या करातून चालणाऱ्या महापालिकेच्या तिजोरीवर असा उघड डल्ला सहन केला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आता या प्रकरणात फक्त कारवाईचा दिखावा होणार की प्रत्यक्ष कठोर शिक्षा दिली जाणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *