मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांचा कालचा बीड येथील ओबीसी मेळावा हा ओबीसींचा नव्हे तर एक विशिष्ट जात व टोळीचा होता, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. हे लोक फक्त ओबीसींच्या नावाने ओरड करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधतात. त्यांना गोरगरीब ओबीसी समाजाचे काहीही देणेघेणे नाही. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधताना ओबीसी समाज खड्ड्यात गेला तरी या लोकांना चालतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांनी भुजबळांपासून अंतर राखल्याचेही कौतुक केले.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची शुक्रवारी बीड येथे महाएल्गार सभा झाली. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध दर्शवत सरकाकडे 2 सप्टेंबरचा हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय रद्दबातल करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर वरील टीका केली आहे. ते म्हणाले, कालचा बीडचा मेळावा हा ओबीसींचा नव्हता. तो एका विशिष्ट जातीचा व टोळीचा होता. हे सिद्धही झाले. हे लोक फक्त ओबीसींचे कैवारी असल्याचा आव आणतात. त्यांनी आता अशी भूमिका घेतली आहे की, आपण फक्त ओबीसी म्हणून बोंबलायचे आणि मराठा – ओबीसीत तणाव निर्माण करून मंत्रिपदे मिळवायची.
त्या घुरट छगन भुजबळांनी सांगितले आहे की, मी ओबीसी म्हणून बोंबललो की, मला न देणारे मंत्रिपद द्यावे लागले. तुलाही (धनंजय मुंडे) मिळेल. म्हणजे, या लोकांना ओबीसींचे काहीही देणेघेणे नाही. ओबीसी मोठा व्हावा हा या लोकांचा उद्देशच नाही. फक्त ओबीसींच्या आडून आपल्या पक्षाला ब्लॅकमेल करायचे आणि मंत्रिपदे मिळवायची हा त्यांचा अजेंडा आहे. या लोकांना फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे आहे. हे करताना ओबीसी समाज खड्ड्यात गेला तरी चालेल असा डाव व षडयंत्र या लोकांनी रचले आहे, असे ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा सर्वसमावेशक राजकारणाचा वारसा चालवण्यासाठी छगन भुजबळांपासून अंतर राखल्याचा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांना आपल्या भूमिकेत सुधारणा करण्याची गरज वाटली असेल. महाराष्ट्रातील व बीड जिल्ह्यातील मराठ्यांचेही हेच मत आहे की, त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या आड येऊ नये. मराठा समाजाने त्यांना 25-30 वर्षे राजकीय करिअर दिले. बहुतेक त्यांनी त्यामुळेच आपल्या भूमिकेत सुधारणा केली असेल. कदाचित त्यांना आपण या जाळात पडूच नये असेही वाटले असेल. हे फसवणारे चक्रव्यूह आहे. त्यामुळे त्या त्यातून बाहेर पडल्या असे दिसत आहे. हे खरे आहे की नाही ते पुढे समाजाला दिसेलच. पण सध्या तरी त्या यातून बाहेर पडल्याचे दिसत आहे, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यावेळी पंकजांविषयी बोलताना पुढे म्हणाले, आपले राजकीय अस्तित्व व बापाने घालून दिलेली पायवाट मोडायला नको. आपल्या बापाने समावेशक काम केले. एक समाज चांगल्या प्रकारे उंचीवर नेला. त्याचा वारसा पुढे चालवायचा असेल तर आपल्याकडून वाकडा पाय पडायला नको, असेही पंकजांना वाटले असेल. कारण, घुरट छगन भुजबळ यांचे चक्रव्यूह प्रचंड घातक व विषारी आहे. त्या षडयंत्रात शिरले की पुन्हा बाहेर पडता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांचे वाटोळे का करायचे? असे वाटले असावे. इथून मागे जे बोललो ते बोललो, पण इथून पुढे सुधारणा करायची असे त्यांना वाटले असेल. त्यामु्ळे त्यांनी ती सुधारणा केली असेल. हे चांगले आहे. त्यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलू नये. आम्हाला त्यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. आम्हाला फक्त आरक्षणाशी देणेघेणे आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.
